क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याचा कुमार बुद्धिबळपटू इथॅन वाझने कॅडेट्स आणि युवा विश्व कप बुद्धिबळ स्पर्धेतील 10 आणि 12 वर्षांखालील गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळविली आहे. या दोन्ही गटातील अंतिम टप्प्यातील स्पर्धेत तो खेळणार आहे.
हल्लीच झालेल्या 12 वर्षांखालील खुल्या विश्व कप बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्षीय इथॅनने संयुक्तपणे तिसरे आणि एकूण पाचवे स्थान मिळविले होते. 78 देशातील 201 खेळाडूंतून त्याचे मानांकन 92वे होते. त्यापूर्वी झालेल्या 10 वर्षांखालील खुल्या विश्वचषक स्पर्धेतून त्याने पात्रता मिळविली.
12 वर्षांखालील गटात इथॅन वाझने (एलो गुण 1384) तीन कँडीडेट मास्टर्सचा पराभव केला. पोलंड, व्हियतनाम आणि कझाकस्थानच्या अनुक्रमे 2090, 1992 आणि 2168 एलो गुण असलेल्या खेळाडूंना इथॅनने नमविले. या स्पर्धेत इथॅनने 7.5 गुणांची कमाई केली. या स्पर्धेत त्याला विजेता अझबैझनच्या आझादीलेव्ह जहांदर आणि मलेशियाच्या पोह यू तियान यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि सचिव किशोर बांदेकर यांनी इथॅनचे अभिनंदन केले आहे.