चंदिगढ / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशातील मंडी आणि विलासपूर जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या सालापडमध्ये विषारी दारू प्यायल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बुधवारी वैद्यकीय सूत्रांनी दिली. मृत झालेल्या चौघांनी मंगळवारी रात्री दारूप्राशन केल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दारू प्यायल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अवैध दारूसाठय़ावर पोलिसांनी छापा टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.
मृतांमध्ये एक टॅक्सीचालक, एक बसचालक, एका राजकीय नेत्याच्या भावाचाही समावेश आहे. बेकायदेशीररित्या आणलेल्या बनावट दारूच्या सेवनाने चौघांचा मृत्यू झाला. ही दारू चंदिगढ येथून तस्करी करून आणल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा तपास करत असून तस्करांचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सदर दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशिष शर्मा यांनी दिली. बनावट दारू पिऊन गंभीर असलेल्या इतर तिघांना नातेवाईकांनी आधी सुंदरनगर येथील उपविभागीय रुग्णालयात आणले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ्य असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेरचौक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणावर ठेवल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.