प्रतिनिधी / सातारा
मला आज या गोष्टीचा समाधान आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार असताना सातारा तालिम संघाला निधी मिळावा याकरता दीपक पवार हे मागणी करत होते. ते नागपूरचे जावई असल्याने त्यांनी डीपीसीतून पैसे द्या असा आदेश दिला होता. अडीच कोटी रुपये दिले गेले. ही तालिम राज्यातली नंबर वन होत आहे. माझ्याकडे राज्याचे अर्थ आणि नियोजनची जबाबदारी आहे. बजेट सादर होताना मी मतदार संघाबरोबरच सातारा तालिम संघासाठी भरीव निधी आणण्यासाठी लक्ष देणार आहे, अशी ग्वाही राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा तालिम संघाच्या मैदानावर सातारा तालिम संघाच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा आयोजित सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर, साहेबराव पवार, बलभिम शिंगरे, दीपक पवार, संदीप मांडवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, या तालिम संघाचे कामकाज मला नवीन नाही. माझे वडिल अध्यक्ष होते. त्यामुळे मला जवळून माहिती आहे. स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी हा तालिम संघ उभा करताना ही इमारत उभी करताना जी मेहनत घेतली. सुरुवातीच्या स्व. श्रीरंग अप्पा असतील, शिंगरेमामा असतील ढोणेकाका असतील, ही जी जुनी मंडळी असतील. सगळयात ज्येष्ठ भाऊ आहेत. या सगळय़ांबरोबर साहेबांचे कुस्तीवर प्रेम होते. त्यांनी कुस्तीला अनन्य साधारण महत्व दिलं होतं. राज्य कुस्तीगिर परिषदेचे ते हयात असेपर्यंत अध्यक्ष होते. त्यांनीच मामासाहेबांना कुस्तीगिर परिषदेवर घेतलं.जे जे राज्य सरकारकडून कुस्तीगिर परिषदेला मल्लांसाठी देता आले. ते दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील मल्ल गेले पाहिजेत. ही त्यांनी भूमिका होती. त्या काळात एवढी मॅटची कुस्ती नव्हती. लाल मातीतली कुस्ती होती. विशेषतः सातारा, कोल्हापूर, सांगली या तीनच जिह्यामध्ये खुप मोठय़ा प्रमाणात मल्ल होते.
साहेबांनी जिल्हा तालिमी असतील, गावागावतील तालिमीना उर्जीत अवस्था आणली. मल्लांना सरकारी नोकरीत घेण्याचे काम केले. पालकमंत्री सहकार्य करतीलच. परंतु माझ्याकडून जे जे सहकार्य होईल, ते ते करणार आहे. अर्थ आणि नियोजन माझ्याकडे आहे. राज्याचे बजेट होताना मतदार संघाबरोबर हे सातारा तालिम संघाचेही काम लक्षात ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले भाऊंनी तालमीसाठी वाहून घेतले आहे. ते लक्ष देतात. सातारा तालिम संघाच्यावतीने होणारा हा सत्कार माझ्या घरातला माझा कुटुंबातील सत्कार आहे. हा सत्कार प्रेमाने स्वीकारतो. जे जे मला या तालिमीसाठी करता येईल ते करणार आहे, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
साहेबराव पवार म्हणाले, जिह्याची परंपरा आहे. आम्ही चव्हाण साहेबांच्या पासून कार्यक्रम पाहिले आहेत. ही चढती कमान अजून ही तशीच आहे. या जिह्याला बाळासाहेब पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या रुपाने दोन मंत्री मिळाले आहेत. जिह्यातील मंडळी ठसा उमटवून गेले आहेत. विलासकाका ही सहकार मंत्री होते. त्यांनी खूप सहकार्य केले. 21 वर्ष जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात होती, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सुधीर पवार म्हणाले, पी.डी.पाटील यांच्यापासून पैलवान दत्तक घेण्याचा वारसा मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चालवला आहे. पैलवान की वाढवणे आणि पैलवानकी रुजवणाऱयांचा सत्कार तालिम संघाकडून होतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच कोटी दिले. काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण तालीम संघाचा प्रकल्प 10 कोटींचा आहे. पूर्वीची इमारत 7 हजार 500 स्केअर फुटाची होती. 1907 सालची होती. नव्याने होणारी इमारत 12 हजार 200 स्केअर फुटाची चार मजली आहे. त्यात साईचे केंद्र सुरू करतोय.माती आणि मॅटही असणार आहे. ही देशातील दुसरी मोठी तालिम होणार आहे. साठ वर्षात साठ पैसे देखील मल्लांकडून घेतले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
तुताऱयांच्या निनादात स्वागत अन् फेटा
मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले. फेटा बांधून त्यांचा सातारी पद्धतीने माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.