प्रवासी भारतीय दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनिवासी भारतीय हे भारताचे विदेशांमधील ‘राष्ट्रदूत’च असून त्यांनी कष्ट आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर विदेशांमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे जगात भारताची मान उंच झाली आहे, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काढले आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर शहरात आयोजित ‘प्रवासी भारतीय दिवस’ समारंभाच्या उद्घाटनानंतर ते भाषण करत होते.
प्रत्येक वर्षी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. यंदाचे या समारंभाचे हे 17 वे वर्ष आहे. लक्षावधी भारतीय नागरिक विदेशांमध्ये स्थायिक झाले असून तेथे त्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे नाव कमावले आहे. ते विदेशात राहून भारतालाही साहाय्य करीत असतात. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांच्यामुळे जगात भारताचे महत्व वाढले आहे, असा मतप्रवाह आहे.
भारत हे ज्ञानाचे केंद्र
भारताची क्षमता जगाच्या ज्ञानाचे केंद्र बनण्याची आहे. एवढेच नव्हे, तर आपला देश कौशल्यवानांची राजधानी आहे. भारतीय लोक विदेशात त्यांची निपुणता, मूल्ये, प्रामाणिकता आणि निर्धार या गुणांमुळे परिचित आहेत. भारतातील युवकही या सर्व गुणांनी युक्त आहेत. त्यामुळे याच निपुणतेच्या आधारावर भारत जगाच्या प्रगतीचे इंजिन बनू शकतो, असा आत्मविश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
यंदाचा प्रवासी दिवस असाधारण
यंदाच आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यामुळे यंदाचा प्रवासी भारतीय दिवस अनेक अर्थांनी वैशिष्टय़पूर्ण आहे. यावेळी या कार्यक्रमात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या प्रसंगांचे प्रदर्शन मांडले आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतकाल आणि प्रवासी भारतीय दिवस असा योगायोग जुळून आला आहे. इंदूर हे भारताच्या हृदयस्थानी आहे. अशा या देशातील सर्वात स्वच्छ शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शहराच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वादही आपल्या अतिथींना घेता येत आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी इंदूर शहराचीही प्रशंसा केली.
दिवस का महत्वाचा ?

प्रवासी भारतीय दिवस किंवा एनआरआय डे हा भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. विदेशस्थ भारतीय समाजाच्या भारताच्या प्रगतीतील भरीव योगदानाची नोंद घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. विदेशातील भारतीयांपैकी बहुतेक जण भारतात पैसा पाठवितात. त्यामुळे भारताला बहुमूल्य विदेशी चलनाची प्राप्ती होते. हा दिवस दरवर्षी 9 जानेवारीला साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1915 मध्ये गांधी भारतात परत आले होते. या महत्वाच्या घटनेची जोडही या दिवसाला आहे.
भारतीयांना व्यासपीठ देण्यासाठी
अनिवासी भारतीयांचा भारताशी संवाद रहावा, त्यांना भारताच्या प्रगतीत सहभाग घेण्याची प्रेरणा देणे, त्यांनी भारतासाठी केलेल्या भरीव कामगिरीची जाणीव ठेवणे तसेच विदेशस्थ भारतीयांना भारताच्या कामगिरीची ओळख करुन देणे यासाठी हा दिवस मानण्यात येतो. 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून तो एक वार्षिक समारंभ बनला आहे. अनेक भारतीय तो साजरा करण्यासाठी विदेशातून आवर्जून भारतात येतात. या भारतीयांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे.