ऑनलाईन टीम / नाशिक :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.
पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.