कारखान्यावर मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, मृतदेह ताब्यात घेण्यावरून तणाव
वार्ताहर / कराड
पडळ (ता. खटाव) येथील खटाव माण साखर (के. एम.) साखर कारखान्यात प्रासेंसिंग हेड या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱयाचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली. जगदीप धोंडिराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कराड) असे मृताचे नाव असून त्यांचा कारखान्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र या प्रकरणात नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनी जिल्हय़ात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप धोंडिराम थोरात यांना पहाटे गोवारे येथे राहत्या घरी त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी कराड हॉस्पिटलमध्ये पहाटे सहा वाजता दाखल केले. तेथे सकाळी 9.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. जगदीप थोरात हे केएम शुगरमध्ये प्रोसेसिंग हेड या पदावर कार्यरत होते. तेथे साखर पोत्यांची अफरातफर झाल्याने प्रोसेसिंग हेड म्हणून त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यातूनच कारखान्यावर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. तेथून कुटुंबीयांनी घरी आणल्यानंतर पहाटे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. कारखान्यावर झालेल्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संशयितांना अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे कराड हॉस्पिटल व उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी नातेवाईकांशी चर्चा करत फिर्याद दाखल करावी, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर तणाव निवळला. तसेच सायंकाळी मृत जगदीप थोरात यांच्यावर गोवारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले की, मृत जगदीप थोरात यांना मारहाण झाल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. सद्यस्थितीत अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. नातेवाईकांचे जबाब व फिर्याद घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यात मृत थोरात यांच्या पाठीवर मारहाणीचे वळ दिसून आल्याचे स्पष्ट झाले.