प्रतिनिधी / बांदा:
बांदा आंगडीवाडी येथील नसीरखान अब्दुलखान बिजली यांच्या ‘रॉयल कॅश्यू प्लाझा’ या दुकानातील 20 हजार रु. रोख व 20 हजार रुपयांचे काजुगर असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. 21 जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत आहे. तशी फिर्याद नसीरखान बिजली यांनी बांदा पोलिसांत दिली आहे. नसीरखान बिजली हे पुणे येथे नातलगाकडे गेले होते. त्याच दरम्यान 21 जानेवारीच्या मध्यरात्री दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानातील 20 हजारांच्या रोकडसह 10 किलो काजूगराच्या दोन पिशव्या चोरून नेल्या. त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत 20 हजार रुपये आहे. 26 जानेवारी रोजी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.