नवीन ‘भारत सीरिज’ लाँच – आता राज्य बदलल्यानंतर वाहन नोंदणीची प्रक्रिया होणार सुलभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील वाहनांसाठी आता नवीन नोंदणी चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या क्रमांकात भारत सीरिजचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे आता वाहनांच्या नंबर प्लेटवर आता राज्याच्या चिन्हाऐवजी ‘बीएच’ (BH) अशी अक्षरे झळकताना दिसतील. या सीरिजनुसार सर्व देशात आता एकच चिन्ह चालणार असून एका राज्यातून दुसऱया राज्यात प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.
वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ‘भारत सीरिज’चा निर्णय घेण्यात आला आहे. जर वाहन खरेदीदारांना वारंवार देशभरात पत्ता बदलावा लागत असेल आणि प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेतून जाण्याची कटकट टाळू इच्छित असल्यास ‘बीएच’ सीरिजची निवड करता येईल. केंद्राने सर्व वाहनांमध्ये भारत सीरिज किंवा ‘बीएच’ नावाने नवीन वाहन नोंदणी चिन्ह सादर केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
नोकरीमुळे स्थलांतर करणाऱयांना लाभ
नवीन ‘बीएच’ सीरिज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नाही आणि ती देशभरात वैध असेल. ही सुविधा संरक्षण कर्मचारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱयांना ऐच्छिक आधारावर उपलब्ध असेल. चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा नोकरीसाठी परराज्यात स्थलांतर करणाऱयांना होणार आहे. प्रत्येक वेळी नवीन राज्यात जाताना त्यांच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी वाहनधारकांना त्याची मोठी मदत होणार आहे.
बीएच सीरिज अंतर्गत मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा 4, 6, 8 वर्षांसाठी आकारला जाईल. खासगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. चौदाव्या वर्षानंतर मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 47 नुसार, मालकाला आपले वाहन ज्या राज्यातील वाहन आहे त्या राज्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवण्याची परवानगी नाही. निर्धारित कालावधीत मालकाला नवीन राज्य प्राधिकरणासह नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.