पदवीधर,शिक्षकच्या रिंगणात सातारा जिल्ह्यातील उरणार कोण?, अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच समजणार चित्र, पदवीधर मतदारांचा एकच होरा उमेदवारांनी आमच्यासाठी काय केलं?, सातारा जिल्ह्यातील 11 जण पदवीधरला तर शिक्षकला 3 जणांचे अर्ज
सातारा / प्रतिनिधी
कोणतीही निवडणूक आली की काहीजण बाह्या दुमडून तयारीला लागतात.मग ती आमदारकी असो की खासदारकी.सध्या पदवीधर आणि शिक्षकची निवडणूक सुरू असून सातारा जिल्ह्यातील हौसे, गवसे आणि नवसे इच्छुकाना आमदारकीची स्वप्ने पहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.पदवीधरसाठी दाखल झालेल्या 78 अर्जापैकी सातारा जिल्ह्यातील 11 जण तर शिक्षकला 3 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.दि.17रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने जिल्ह्यातील नेमके कोण कोण रिंगणात राहणार आहे याकडे लक्ष लागून आहे.दरम्यान, अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांना आताच आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहे.
सातारा जिल्ह्यात असे काही कार्यकर्ते आहेत की त्यांना कोणतीही निवडणूक आली तरी हे त्या निवडणूकीत पुढे असतात.मग त्यांच्यासोबत ना कार्यकर्त्यांची फौज ना त्यांना मतदारांची ओळख.पण निवडणुकीत उतरणारच हे त्यांचं सूत्र असत.आता सुरू असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी असा कोणता नियम नाही की पदवीधरला उमेदवार किमान पदवीधर असावा किंवा शिक्षकला तो शिक्षक असावा मग काय इच्छुकांना आमदारकी स्वप्न पडू लागली. पुणे पदवीधरसाठी सातारा जिल्ह्यातील 11 जणांनी अर्ज भरले आहेत.जरी ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणार असली तरीही सातारा जिल्ह्यातील हौसे, गवसे आणि नवश्याना मात्र आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत.
पदवीधरला सातारचे अभिजित बिचुकले, वडजलचे गणेश काटकर,सातारचे जयंत लंगडे, गडकर आळीतले नितीन माने,विकासनगरचे महारुद्र तिकुंडे, सैदापुरचे माणिक बनकर, महामुलकरवाडीचे ऍड.मंगेश महामुलकर, डाळमोडीचे ऍड.राजीव चव्हाण, उंब्रजचे शैलेश मोहिते, सदरबाजारचे सागर भिसे आणि गोपूजचे ऍड.संतोष कमाने तर शिक्षकसाठी दाखल झालेल्या 51 अर्जामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारचे अभिजीत बिचुकले, कराडचे रणजित पिसे आणि सातारचे सुधीर विसापूरे यांनी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील कोण कोण मागे घेते आणि कोण रिंगणात उभे राहते याकडे लक्ष लागून आहे.दरम्यान, पदवीधरसाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांचा प्रचार सुरू झाला आहे.इतर उमेदवारांना अजून चाचपनीच सुरू आहे.