जगाच्या प्रवासासाठी केले विक्रमी उड्डाण
बेल्जियन-ब्रिटिश वैमानिक जारा रदरफोड (19 वर्षे) हिने एकटय़ाने जगाचा प्रवास करण्याचा विक्रम करण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी बेल्जियमच्या कोर्तरिज्क विमानतळावरून उड्डाण केले आहे. अमेरिकेच्या शाइस्ता वैजचा विक्रम मोडण्याचा रदरफोर्डचा प्रयत्न आहे. शाइस्ताने वयाच्या 30 व्या वर्षी विक्रम नोंदविला होता. तिने एकटय़ाने मायक्रोलाइट विमानातून जगाचा प्रवास केला होता. जगाचा प्रवास केल्यावर विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणित विषयात कारकीर्द घडविण्यासाठी अन्य मुलींना प्रेरित करू शकेन अशी अपेक्षा जाराला आहे.
रदरफोर्डला स्वतःचा निश्चित मार्ग पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान ती 52 देशांमध्ये थांबणार आहे, यात ग्रीनलँड, चीन, निकाराग्वा देखील सामील आहे. तेथे ती स्थानिक कुटुंबे किंवा हॉटेलमध्ये राहणार आहे. जाराचे आईवडिल दोघेही वैमानिक आहेत. अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जारा पुढील वर्षापासून विद्यापीठात शिक्षणासाठी जाणार आहे. ऍडव्हेंचरवर प्रेम असणाऱया जाराला अंतराळप्रवासाची इच्छा आहे.