वृत्तसंस्था / ईटानगर
भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसून येत नाही. चीन सातत्याने भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे. भारतीय सैन्याने बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रात बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. याअगोदर पूर्व लडाखमध्ये बोफोर्स तोफा तैनात करण्यात आल्या होत्या.
सीमेवरून सैनिक हटविण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सैन्य आणि कूटनीतिक स्तरावर अनेक फेऱयांमधील चर्चा पार पडली आहे. तरीही दोन्ही देशांचे सैन्य अनेक ठिकाणी परस्परांसमोर उभे ठाकले आहे. याचदरम्यान चीनने भारतासोबत चर्चेच्या आडून सीमेवर 100 हून अधिक ऍडव्हान्स्ड रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक 155 एमएम कॅलिबरची पीसीएल-181 सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झरही तैनात केलेली आहे.
हिवाळय़ापूर्वीची तयारी
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हिमालयातील रक्त गोठवून टाकणाऱया हिवाळय़ासाठी तयारी करत आहे. एम777-अल्ट्रा-लाइट हॉवित्झरसोबत भारतीय सैन्याच्या तीन रेजिमेंट्सच्या तैनातीच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आल्याचा चीनच्या प्रसारमाध्यमाने दावा केला आहे. चीनने भारतीय सीमेवर टाइप पीसीएल-191 रॉकेट लाँचरही तैनात केले आहे. या रॉकेट सिस्टीमचा मारक पल्ला 350 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते. ही मॉडय़ूलर रॉकेट सिस्टीम 370 मिमिच्या 8 रॉकेट्सना डागू शकते. चिनी सैन्याने 100 हून अधिक पीसीएल-181 ट्रक माउंटेड हॉवित्झरना देखील तैनात केले आहे.