प्रतिनिधी / फलटण :
फलटण येथील प्रांत आधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वाळूमाफीया संशयीतास अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करीत महसूल कर्मचाऱ्यांनी आज लेखनी बंद आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि .16 रोजी सायं 7 च्या सुमारास सजाई गार्डन येथील शासकीय बैठक कामकाज आटोपल्यानंतर प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव व अन्य आधिकारी फलटणकडे जात असताना या मार्गावरून बेकायदा विनापरवाना वाळुचा हायवा ट्रक भरधाव वेगात फलटणकडे जात होता. संबधीत ट्रकचालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे गांव कामगार तलाठी धेंडे यांनी वाळुचा हायवाट्रक पोलिस ठाण्यात घेवुन जाण्याच्या सुचना केली. मात्र या सुचनेकडे दुर्लक्ष करीत ट्रकचालकाने ट्रक तसाच पुढे रेटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतः प्रांत आधिकारी यांनी ट्रक पोलिस ठाण्यात घे अशा सुचना केल्या असता संशयीत आरोपी कैलास महादेव ननावरे यांनी प्रांत आधिकारी यांच्या अंगावर धावत जावुन धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली.