उंब्रज/प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून उंब्रज परिसरात पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी पावसाचे वातावरण,सकाळी थंडी, दिवसभर उकाडा वाढत असताना आज सकाळी दूरपर्यंत धुके दाटले होते. महामार्ग व परिसरातील रस्ते आणि इमारती या धुक्यामध्ये हरवून गेल्याचे चित्र रविवारी पहाटे नागरिकांना दिसत होते. सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पड़लेल्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद घेतला.
मागील तीन दिवसांपासून उंब्रजला ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर आज संपूर्ण परिसर धुक्याखाली झाकोळला गेला. धुके इतके दाट होते की काही अंतरावरचे ही दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या उंब्रजरांनी ऐन मार्च महिन्यात धुक्याचा आनंद मनमुराद लुटला. उंब्रजच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये अनेक डोंगर टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निग वॉक साठी जाणाऱ्यांची संख्याही
मोठी आहे. वराडे येथील खरजली मंदीर, भवानवाडी,कोरीवळे, आनंदपुर गोड़वाड़ी येथील टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना आज हे धुके पहायला मिळाले.