मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन : म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे मुख्यमंत्र्याहस्ते लोकार्पण
फोंडा : गोवा पोलीस गुन्ह्याची उकल करण्यात 94 टक्के यशस्वी कामगिरी बजावत देशभरात सर्वोच्चस्थानी आहे. राज्यात बिगरगोमंतकीयाच्या वाढत्dया गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेत मांद्रे व इतर भागातही नवीन पोलीस स्थानके उभारण्यात येईल. ऑनलाईन फसवणूक व सायबर गुन्ह्याची प्रकरणे पोलीसांसाठी आव्हान ठरत आहे. शांतताप्रिय गोव्याची ओळख राखून ठेवण्यासाठी सुजाण नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या काल गुरूवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. फोंडा तालुक्यासाठी म्हार्दोळ येथे जुन्या आऊट पोस्टच्या जागी आधुनिक सुविधेसह सुसज्ज स्वतंत्र पोलीस स्थानक उभारलेले आहे. यावेळी त्याच्यासोबत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलीस उपमहानिरीक्षक असलम खान, ए कोयन, उत्तर गोवा पोलीस अधिक्षक अभिषेक धानिया, प्रियोळ जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, बेतकी खांडोळाचे जि. प. सदस्य श्रमेश भोसले, वेलिंग प्रियोळ कुंकळ्योच्या सरपंचा हर्षा गावडे, तिवरे वरगांवचे सरपंच जयेश नाईक, बेतकी खांडोळाचे विशांत नाईक, वेरे वाघुर्मेचे सरपंचा शोभा पेरणी, वळवईचे सरपंच विनायक वेगुर्लेकर, भोमाचे सरपंच दामोदर नाईक, कुंडईचे सरपंच सर्वेश जल्मी, मडकईचे सरपंच शैलेद्र पणजीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गोमंतकीयांनी आपल्या शेजारी बिगरगोमंतकीयांची माहिती जाणून घेणे, दर शनिवारी पोलिसांतर्फे समाधान उपक्रम राबविण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा, क्राईम शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, महिला पोलीसांसह पिंक फोर्स गोवा पोलीसांच्या सेवेत रूजू करण्यात आलेली आहे. सायबर सुरक्षा प्रयोगशाळा रायबंदर येथे उभारलेली आहे. शांती, सेवा, न्याय हे ब्रिदवाक्य असलेल्या गोवा पोलिसांना केवळ गुन्ह्याची उकल करण्यासाठी तसेच नागरिकांना सकारात्मकरित्या सहकार्य करण्यासाठी पोलिसांना नेहमी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
म्हार्दोळ पोलीस स्थानक, जाहीरनाम्याची स्वप्नपुर्ती
यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की म्हार्दोळ येथील आऊट पेस्टचे रूपांतर पोलीस स्थानकात करणे हे आपल्या निवडणूकीच्या जाहीरनाम्याचा प्रमुख विषय होता. प्रियोळ मतदारसंघातील वेलिंग प्रियोळ, भोम अडकोण, तिवरे वरगांव, माशेल, बेतकी खांडोळ, वेरे वाघुर्मे, वळवई व केरी या सात ग्रामपंचायतींसह कुंडई व मडकई औद्योगिक वसाहती हे म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे कार्यक्षेत्र विस्तारलेल्या क्षेत्राला सुरक्षा पुरविण्याचे जबाबदारी ही खऱ्या अर्थाने समाजकार्याची स्वप्नपुर्ती असल्याचे ते म्हणाले. याकामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सदैव सहकार्य लाभल्यामुळे त्याचे आभार व्यक्त केले. रखडलेली सर्व कामे डॉ. सावंत यांनी चालीला लावली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. विधीवत मंत्रघोषानंतर, फित कापून पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्ज्चलनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. सोहळ्याला उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, महिला पोलीस उपअधिक्षक सुनिता सावंत, उपअधिक्षक आशिष शिरोडकर, फोंड्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर तसेच दक्षिण गोव्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. म्हार्दोळ पोलीस स्थानकात पहिले पोलीस निरीक्षक म्हणून मोहन गावडे यांची वर्णी लागलेली आहे. स्वागत व प्रास्ताविक पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला उपनिरीक्षक लवरिना सिक्वेरा यांनी केले. उत्तर गोवा पोलीस अधिक्षक अभिषेक धानिया यांनी आभार मानले.