पर्यटन खात्याच्या जागेत स्क्रॅप बनविल्याची दखल घेत केली पाहणी
प्रतिनिधी /पेडणे
मालपे पेडणे येथील पर्यटन खात्याच्या सरकारी जागेत पर्यटन खात्याने स्क्रेप बनवल्याची दखल पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी अचानक भेट देऊन या परिसराची केली पाहणी, पेडणे मतदारसंघाचे आमदार यांनी अनुपस्थितीत पहाणी
मालपे पेडणे येथील पर्यटन खात्याच्या सरकारी जागेत मागच्या दहा वर्षापासून गोवा दरबार हे हॉटेल बंद आहे आणि या जागेची योग्य ती दखल घेतली जात नसल्याने, पर्यटन खात्याच्या राज्यातील विविध वाहने जलक्रीडा करणाऱया बोटी या ठिकाणी स्क्रेप अड्डा म्हणून ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि हा परिसर भंगार अड्डय़ाच्या पद्धतीने तयार केला होता. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत होते. तशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होताच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या जागेला भेट देऊन या परिसराची पाहणी केली.
पर्यटन मंञी पेडणे मतदारसांघात आले आणि त्यांनी मालपे येथील पर्यटन खात्याच्या बंद असलेल्या हॉटेल व परिसराची पहाणी केली माञ पेडणे मतदारासंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना याबाबत कोणतेही कल्पना दिली नसल्याने पेडणेतील भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रवीण आर्लेकर यांना या भेटीदरम्यान का डावलण्यात आले याबाबत त्यांना विचारले असता आपल्याला कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नसल्याचे प्रवीण आर्लेकर याःनी सांगितले .
या परिसराची पाहणी केल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना मंत्री रोहन खवटे म्हणाले की या जागेविषयी आपण अभ्यास करणार आहे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन यांच्याकडे चर्चा केली जाईल आणि 2018 साली कोणत्या पद्धतीचा करार झाला होता त्या कराराविषयी माहिती जाणून घेऊन जर ही जागा एखाद्या खाजगी कंपनीला दिली होती तर ती जागा आज पर्यंत का वापरण्यात आली नाही , यावरही आपण चर्चा करून याविषयी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांनी पर्यटन वाढीस सहकार्य करावे
मंत्री रोहन खंवटे यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रसार माध्यमांचा पर्यटन व्यवसायाची आणि पर्यटन क्षेत्राशी महत्त्वाचा वाटा असल्याने प्रसार माध्यमांनी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचप्रमाणे सहकार्य करायला हवे एखादे वृत्त प्रसिद्ध करून किंवा प्रसारमाध्यमांकडे वृत्त देऊन पर्यटनाशी प्रश्नचिन्ह निर्माण करु नये किंवा पर्यटकाना गैरसमज निर्माण होणार नाही याचीही दखल घ्यावी असे आवाहन मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी केले.
2018 साली ही जमीन एखाद्या कंपनीला जर खाजगी लीजवर दिली तर त्याचा जो सरकारला महसूल मिळायचा होता तो महसूल मिळाला का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता ज्या कंपनीकडे हा करार केलेला आहे आणि त्यांनी सरकारचा महसूल बुडवला असेल तर गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन यांच्याशी आपण चर्चा करून योग्य तो निर्णय आणि योग्य ती वसुली करून घेणार असल्याचेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.