यात्रेसाठी जय्यत तयारी : आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळला : मोठय़ा प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता, बकरी खरेदीसाठी धावपळ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणारी वडगाव येथील मंगाईदेवीची यात्रा मंगळवार दि. 26 रोजी होणार आहे. यात्रेसाठी वडगाव येथील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. वडगावमध्ये गल्लोगल्ली उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी व आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावषी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठय़ा प्रमाणात गर्दी होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
दरवषी श्रावण महिन्यापूर्वी पेरणीची कामे आटोपल्यानंतर मंगाईदेवीची यात्रा भरते. काही वर्षांपूर्वी यात्रेला लहान स्वरूप होते. परंतु सध्या यात्रेला भव्य स्वरूप मिळाले आहे. यात्रा जरी मंगळवारी असली तरी पुढील दोन ते तीन दिवस भाविकांची गर्दी सुरूच असते. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी मंगाईदेवी यात्रा कमिटीकडून घेतली जात आहे. मंगाईदेवी मंदिराला आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. याचबरोबर मंगाईनगर, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, संभाजीनगर, यरमाळ रोड या परिसरात विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात फुले व पूजेच्या साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. मोठी वाहने मंदिरापर्यंत येऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. विष्णू गल्ली, यरमाळ रोड परिसरात खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. पाळणे, लहान मुलांसाठी विविध खेळ दाखल झाले आहेत. कोंबडे व बकरी खरेदीसाठी सोमवारी रात्रीपर्यंत नागरिकांची धावपळ सुरू होती.
ठिकठिकाणी लावले बॅरिकेड्स
मंगळवारी रात्री सर्वच बाजूंनी भाविक वडगाव येथे यात्रेसाठी दाखल होतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यावषी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस व महानगरपालिकेकडून नियोजन केले जात आहे. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात येणार आहेत. येळ्ळूर क्रॉस येथूनच मोठय़ा वाहनांना माघारी फिरावे लागणार आहे.