वृत्तसंस्था/ पर्ल
डेव्हिड मलानच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. 33 वर्षीय मलानने 40 चेंडूत 55 धावा झोडपल्या.
या दुसऱया सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 146 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 19.5 षटकांत 6 बाद 147 धावा जमवित हा सामना केवळ एक चेंडू बाकी ठेवून 4 गडय़ांनी जिंकला. या मालिकेतील गेल्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 5 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली होती. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी न्यूलँड्स येथे खेळविला जाणार आहे.
दुसऱया सामन्यात खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये कर्णधार डिकॉकने 18 चेंडूत 30, जॉर्ज लिन्डेने 20 चेंडूत 29, व्हान डर डय़ुसेनने 29 चेंडूत नाबाद 25, हेंड्रिक्सने 18 चेंडूत 16, बहुमाने 10 चेंडूत 13, डु प्लेसिस 11 चेंडूत 11, रबाडाने नाबाद 5 धावा केल्या. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. इंग्लंडतर्फे रशीदने 23 धावांत 2 तर आर्चर, करन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लिन्डे आणि व्हान डर डय़ुसेन यांनी सहाव्या गडय़ासाठी 44 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात मलानने 40 चेंडूत 55, कर्णधार मॉर्गनने 17 चेंडूत नाबाद 26, रॉयने 19 चेंडूत 14, बटलरने 15 चेंडूत 22, बेअरस्टोने 3, स्टोक्सने 13 चेंडूत 16, सॅम करेनने 1, जॉर्डनने नाबाद 3 धावा जमविल्या. इंग्लंडने केवळ एक चेंडू बाकी असताना विजयी धाव घेतली. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने 19 धावांत 3, निगेडीने 51 धावांत 2 तर रबाडाने 25 धावांत 1 गडी बाद केला. गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा पराभव आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका-20 षटकांत 6 बाद 146 (डिकॉक 30, लिनेडी 29, व्हान डर डय़ुसेन नाबाद 25, हेंड्रिक्स 16, बहुमा 13, डु प्लेसिस 11, क्लेसन 7, रबाडा नाबाद 5, रशीद 2-23, आर्चर, जॉर्डन, टॉम करन प्रत्येकी एक बळी)
इंग्लंड 19.5 षटकांत- 6 बाद 147 (मलान 55, मॉर्गन नाबाद 26, बटलर 22, स्टोक्स 16, रॉय 14, बेअरस्टो 3, सॅम करन 1, जॉर्डन नाबाद 3, शम्सी 3-19, एन्गिडी 2-51, रबाडा 1-25.)