जिल्हय़ांतर्गत अर्ज करण्यासाठी नवे संकेतस्थळ
प्रतिनिधी/ बेळगाव
परप्रांतीयांना स्वगृही जाण्यासाठी परवानगी देण्याकरिता सुरू करण्यात आलेले ऑनलाईन ऍप दुसऱया दिवशीही बंदच आहे. त्यामुळे परप्रांतीयांनी कुमार गंधर्व सभागृहात गर्दी केली होती. विचारणा करण्यासाठी नागरिकांची मनपा कार्यालयात धावपळ होत आहे. राज्यांतर्गत परवानगीसाठी आता www.supportbelgavi.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहेत. काही व्यवसाय सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, विविध कामानिमित्त बेळगावात असलेल्या परप्रांतीय कामगारांनी कोरोनाच्या धास्तीने घर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने सर्वांचीच कुटुंबीय भयभीत झाली आहेत. त्यामुळे कामानिमित्त विविध राज्यात वास्तव्यास असलेले नागरिक कुटुंबाच्या ओढीने स्वगृही परतण्यासाठी आटापीटा करीत आहेत.
शासकीय परवानगीशिवाय परराज्यात जाता येत नाही. परराज्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा राज्य शासनाने सुरू केली आहे. मात्र, ही सुविधा मंगळवारपासून बंद आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यासाठी महापालिका कार्यालयात 10 संगणकांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. पण कार्यालयासमोर गर्दी होत असल्याने तसेच नागरिक उन्हात थांबत असल्याने कुमार गंधर्व सभागृह आवारात हे काऊंटर स्थलांतर करण्यात आले आहे. पण ऑनलाईन अर्ज करण्याचे ऍप मंगळवारपासून बंद आहे. सायंकाळपर्यंत ही सुविधा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले होते. पण बुधवारी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली नाही. अर्ज करण्यासाठी परप्रांतीय नागरिकांनी कुमार गंधर्व सभागृहासमोर मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली. दुसऱया दिवशीदेखील ऑनलाईन सुविधा बंद असल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. त्यामुळे सरकारच्या या उपक्रमाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
कामगार-विद्यार्थ्यांसाठी ई-पास देण्याची सुविधा सुरू राज्यांतर्गत जाणाऱया कामगारांना व विद्यार्थ्यांसाठी ई-पास देण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात जाण्यासाठी www.supportbelgavi.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.