वार्ताहर / मडकई
कोरानाचा जागतिक स्तरावर पसरलेला संसर्गं संपूर्ण नष्ट व्हावा. तसेच त्यातून पृथ्वीवरच्या समस्त मानव जातीचे रक्षण होऊन डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून मगो पक्ष व ब्राम्हणवृदांतर्फे महामृत्युंजय जपाला वामनेश्वर मंदिरात सुरूवात करण्यात आली.
काल शुक्रवारी 31 रोजी सकाळी ढवळी येथील वामनेश्वर मंदिरात तर दुपारी कवळे येथील कपेलेश्वर मंदिरात गणेश पूजनाने प्रारंभ करण्यात आला. पुरोहित गुरुदास शिवडेकर यांच्या अधिपत्याखाली विश्वनाथ साधले यांनी पूजेचे यजमानपद भूषविले.
यावेळी मगोचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य द्रुपदा नाईक, मनोज बोरकर, श्वेता गावडे, सोनाली तेंडूलकर, समिता नाईक, तळावलीचे पंचसदस्य हर्षल तळावलीकर, देवस्थानचे अध्यक्ष मोहन ढवळीकर, मुख्यात्यार रामचंद्र भास्कर बखले, उदय ढवळीकर, भालचंद्र बखले, उपाध्यक्ष कपिल ढवळीकर, सेवेकरी रजनीश कपेलेश्वरकर, संदेश कपेलेश्वरकर, लक्ष्मीकांत कपेलेश्वरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
महामृत्यूंजय जप सात दिवस विविध मंदिरातून केला जाणार आहे. यानंतर महालक्ष्मी संस्थानात, नागेश संस्थानात, मगो पक्षाची कुलस्वामीनी असलेली म्हार्दोळची महालसा देवी, केरी येथील विजयादुर्गा देवी, कुंडई येथील नवदुर्गा देवी, मंगेशी येथील मंगेश देवस्थान, माशेल येथील देवकीकृष्ण, खांडोळा येथील श्री गणपती देवस्थान अशा अनेक देवस्थानातून हा महामृत्युंजय जप केला जाणार आहे, अशी माहिती आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली. कोरोनाच्या महामारीमुळे देशात अनेकांचे बळी गेलेले आहेत. डॉक्टर्स, परिचारिका रुग्णांना औषधोपचार देत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश यावे, तसेच प्रत्येकाची रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून हा महामृत्युंजय जप करण्यात येत आहे. प्रत्येक देवस्थानातून 1 लाख जप केला जाईल. तसेच प्रत्येकाने महादेव, दत्त महाराज व देवीचे नामजप केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढीस लागते. त्यासाठी प्रत्येकाने किमान 1 तास या देवांचा नामजप करावा, असे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.