वृत्तसंस्था/ कोलंबो
अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल लंकेचा क्रिकेटपटू शेहान मदुशनका याला लंकेच्या पोलिसांनी 23 मे रोजी अटक केली होती. त्यामुळे लंकन क्रिकेट मंडळ यापूर्वी मदुशनकाबरोबर केलेला मध्यवर्ती करार रद्द करण्याचा विचार करत आहे.
मदुशनका आणि त्याचा मित्र मोटारीतून जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले आणि त्यांची तपासणी केली. मदुशनकाकडे हेरॉईन हा अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाला या प्रकरणाची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर अशा प्रकरणात मदुशनका गुंतला असेल तर त्याच्या बरोबर लंकन मंडळाने केलेला मध्यवर्ती करार स्थगित केला जाईल, असे मंडळाचे सीईओ ऍश्ले डिसिल्वा यांनी सांगितले. लंकन क्रिकेट मंडळाने पहिल्यांदाच मदुशनकाशी मध्यवर्ती करार केला आहे. 2018 साली 25 वर्षीय मदुशनकाने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविली होती.