मंत्री शंभूराज देसाई- महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी चांगलीच
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांवर शासनाचा कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. त्यांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य महाआघाडीच्या शासनाने दिलेले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपासही आम्ही एटीएसकडे सोपवला होता. मात्र अचानक एनआयएने तपासात उडी घेत राज्य शासनावर अविश्वास दाखवलेला आहे. मात्र यामुळे राज्य शासन बॅकफूटवर आलेले वैगेरे काही नाही. राज्य शासनाने कोणालाही पाठीशी घातलेले नाही व महाराष्ट्र पोलीस दलावर अविश्वास दाखवणे चुकीचे असून त्यांचे काम चांगलेच असल्याचा दावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
पोलीस मुख्यालयात गुंड गजा मारणेला धाडसाने पकडणाऱया मेढा पोलिसांचा गौरव केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी त्यांच्या व्हॉटसऍप स्टेटसवर जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली असून माझ्याकडे असता पेशन्स नसल्याचे म्हटले आहे. आता वाझेंना अटक झाली असून त्याचा तपास एनआयए करत आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई यांनी राज्य सरकार निपक्षपणे काम करत आहे. आम्ही कोणत्याही अपप्रवृत्तींना पाठीशी घालत नाही. त्यामुळे आरंभी वाझे प्रकरणाचा तपास लोकल क्राईम ब्रँचकडे दिला होता. नंतर एटीएसकडे सोपवण्यात आला. मात्र, त्यात केंद्रीय तपास विभागाने त्यात उडी मारली आहे. मात्र अशा प्रकारची केंद्र सरकारची कृती समर्थनीय नसल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीचा मालक मनसुख हिरनचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. यात एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले. त्यामुळे वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आलीय. त्यावर मंत्री देसाई यांनी आता एनआयए तपास करत असल्याने त्या यंत्रणेकडून याची माहिती घ्या, असे सांगितले.
जिल्हा पोलीस दलाची कामगिरी अभिनंदनीय
एसपी अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलाकडून चांगली कामगिरी सुरु आहे. मेढा पोलिसांनी गजा मारणेला पकडण्याची केलेली कामगिरी असो व भुईंजमधील क्लिष्ट खुनाचा तपास करुन आरोपींना मोक्का लावण्याची कामगिरी असो या दोन्ही कारवाई अभिनंदनीय आहेत. पडळ कारखाना घटनेत देखील संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला असून पोलीस दलावर कोणाचाही दबाव नसल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
पोलीस वसाहतीच्या कामाची पाहणी
पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या पोलीस दलाच्या गृहप्रकल्पाची पाहणीही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. हे काम कशा पध्दतीने सुरु आहे त्याची माहितीही एसपी बंसल यांच्याकडून तसेच ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांकडून घेतल्यानंतर त्यांनी या गृहप्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच ही योजना पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळेल. हे एक चांगले काम जिल्हय़ाच्या ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले.