मस्कत / वृत्तसंस्था
भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत ओमानचा 26 धावांनी पराभव केला आणि सुपर-12 मध्ये स्थान संपादन करण्याची आशाअपेक्षा कायम राखली. सलामीवीर मोहम्मद नईमने शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर बांगलादेशने ओमानसमोर 154 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात मुस्तफिजूर रहमानच्या (4-36) भेदक गोलंदाजीसमोर ओमानला 9 बाद 127 धावांवर समाधान मानावे लागले. ओमान व बांगलादेशच्या खात्यावर आता प्रत्येकी 1 विजय नोंद असून उर्वरित एका जागेसाठी त्यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. ओमानची पुढील लढत स्कॉटलंडविरुद्ध होईल तर बांगलादेशचा संघ पीएनजीविरुद्ध लढणार आहे.