सेन्सेक्समध्ये 800 अंकांची वाढ, इंडसइंड बँक नफ्यात
वृत्तसस्था/ मुंबई
वसुबारसने सोमवारी दिवाळीची खऱया अर्थाने सुरूवात झाली तशी बाजारानेही 800 अंकांच्या वधारासह दिवाळी साजरी केली. निफ्टी निर्देशांकही वधारत बंद झाला. बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले.
सोमवारी नोव्हेंबरच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार जोमात दिसला. सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 831 अंकांच्या वधारासह 60,138.46 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 258 अंकांच्या वाढीसह 17,929.65 अंकांवर बंद झाला. इंडसइंड बँक, हिंडाल्को, भारती एअरटेल, एचसीएल टेक, ग्रेसीम हे निफ्टीत तेजी राखून होते. तर दुसरीकडे युपीएल, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा आणि महिंद्रा आणि नेस्ले यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच सेलच्या समभागांनी 10 टक्के उसळी घेतल्याचे पहायला मिळाले. वरूण बेव्हरेजेस, गुजरा नर्मदा व्हॅली, शोभा, लक्स इंडस्ट्रिज, ओबेरॉय रिऍल्टी, डेल्टा कॉर्प, इंडियाबुल्स रिऍल्टी, डिक्सन टेक्नॉलॉजीस यांचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत.
दुपारी सेन्सेक्स 734 अंकांनी वधारलेला होता. तर निफ्टी 239 अंकांच्या वाढीसह कार्यरत होता. इंडसइंड बँकेचे समभाग 7 टक्के आणि भारती एअरटेलचे समभाग 4 टक्के इतके वाढल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी शेअर बाजारात तेजीसह खुला झाला. सेन्सेक्स 270 अंकांच्या वाढीसह 59,577 अंकांवर तर निफ्टी 133 अंकांच्या वाढीसह 17,804 अंकांवर व्यवहार करत होता.
दोन दिवस बाजार राहणार बंद
दरम्यान दिवाळीचा हा आठवडा असल्याने भारतीय भांडवली बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजन व शुक्रवारी पाडव्यानिमित्त भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजे या आठवडय़ात तीनच दिवस शेअर बाजाराचे व्यवहार होणार आहेत.