वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना फटका
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील महासमुंद येथील गडफुलझर येथे मंगळवारी रात्री वीटभट्टीतून निघालेल्या धुरामुळे गुदमरून 5 मजुरांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर बसना कम्युनिटी सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मजुरांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बसना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंजबिहारी पांडे यांच्या मालकीच्या वीटभट्टीत ही घटना घडली आहे. पांडे यांनी मजुरांना विटा बनवण्याचे कंत्राट दिले होते. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वीटभट्टीवर काम सुरू होते. त्यानंतर सर्व कामगार जेवण करून झोपी गेले असता तेथे पसरलेल्या धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून सर्वांना बसना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे डॉक्टरांनी 5 मजुरांना मृत घोषित केले. दुसरीकडे मनोहर बिसी (30 वर्षे) या मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मध्यरात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यानची असल्याचे बसना पोलीस स्थानकाच्या प्रभारी कुमारी चंद्राकर यांनी सांगितले. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत छत्तीसगडच्या बलरामपूर जिह्यातही अशीच एक घटना समोर आली होती. तेथे वीटभट्टीवर झोपलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला होता.