मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नुकताच मी गुजरात येथे गेलो हेतो. नवीन शैक्षणिक धोरणात वेगवेगळय़ा गोष्टींची अंमलबजावणी करण्याची तयारी विविध राज्यात सुरू असून गोवा या गोष्टींपासून एक पाऊल पुढे आहे. नवीन शैक्षणिक धोरण केजीपासून ते प्राथमिक वर्गापर्यंत यंदापासून सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय उच्च शिक्षण स्तरावरही लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून शिक्षण क्षेत्रातील सर्व स्टेकहोल्डर्सना विश्वासात घेऊन उच्च शिक्षण स्तरावर कशाप्रकारे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करता येतील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत अशोक शाह यांच्या ‘टूगेदर एजायल’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना दिली.
यावेळी लेखक अशोक शाह, शिक्षण सचिव रवी धवन आयएएस, मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित रॉय आयएएस, शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर व इतर मान्यवर उपस्थित हेते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते एजायल टूगेदर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
टूगेदर एजायल हे पुस्तक शैक्षणिकरित्या व इतर संस्थांना शैक्षणिक धोरण कशाप्रकारे अंमलबजावणी करावी यासाठी मदतनीस ठरेल. अशोक शाह व इतर त्यांच्या सहकार्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केला आहे. याशिवाय या पुस्तकाद्वारे नवीन शैक्षणिक धोरणाची शाळांमध्ये कशाप्रकारे करावी याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर सदर पुस्तक शिक्षण खात्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये वितरित करावीत. ज्यामुळे धोरणाची अंमलबजावणी करायला मदत होईल असे मुख्य़मंत्र्यांनी यावेळी सांगितले.