रंगांच्या माध्यमातून मानवाचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्याचे एक शास्त्र आजही अभ्यासले जाते. क्रोमोथेरपी असे त्या शास्त्राचे नाव आहे. क्रोमो हा ग्रीक शब्द असून जिचा अर्थ कलर किंवा रंग असा होतो. तणाव, उच्च रक्तदाब अशा अनेक विकारांवर या क्रोमोथेरपीचा उपयोग होताना दिसतो. सूर्यप्रकाशाची ऊर्जा शरीराला न मिळाल्यास आपल्याला विविध विकारांना तोंड द्यावे लागते. क्रोमोथेरपीच्या माध्यमातून उपचार करता येतात. याच क्रोमोथेरपीतील करिअरच्या संधीचा वेध घेऊया.
वै द्यकीय क्षेत्रात नवनवे संशोधन होत असतेच. क्रोमोथेरपी उपचार पद्धती ही हजारो वर्षापासून आपल्याकडे अवलंबली जात आहे. सात रंगांची मात्रा प्रकाशाच्या साथीने आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक असते. ही मात्रा कमी जास्त झाली की विकारांचा सामना करण्याची वेळ येते. रंगांच्या वापरातून केलेले उपचार मानवी शरीराचे स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यही उत्तम राखण्यास मदत करतात. शरीराच्या बाहय़ आणि अंतर्गत विकारावर या थेरपीच्या साहाय्याने मात करता येते.
विविध रंगांच्या माध्यमातून आपले शरीर, स्वास्थ्य कसं सुयोग्य राखलं जातं ते पाहुया-
निळा- रक्तदाब कमी करतो तसेच हृदयाची धडधड यावर नियंत्रण ठेवतो. शीतलता प्रदान करणारा हा रंग आहे. यकृतातील बिघाड रोखतो.
लाल- रक्तदाब, हृदयाची धडधड वाढवणारा हा रंग आहे. कमी रक्तदाब, पॅरालिसीस, ऍनिमीया, टय़ुबरसंबंधीत विकारात या रंगाची थेरपी काम करते, असं म्हणतात.
हिरवा- शरीर आणि डोकं शांत तसेच स्थिर ठेवण्यास मदत करतो. हृदयविकार, कॅन्सर, ब्राँकाइटीस, कफ, सांध्यात होणारी जळजळ थांबवण्यास मदत करतो.
पिवळा- शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करणारा हा रंग. त्वचेचे विकार, डायबिटीस (मधुमेह) अशा विकारांवर मात करण्यासाठी या रंगाची थेरपी लागू पडते, असं म्हणतात.
नारंगी- तणावात असणाऱयांना बाहेर काढण्यास मदत करणारा हा रंग. किडनी, हार्निया, अपेंडीससारख्या विकारावर या रंगाच्या थेरपीचा वापर होतो. निराशा आणि थकावट दूर करण्याचे कामही हा रंग करतो.
व्हायोलेट- शांततेचं प्रतिक असल्याने शरीराच्या अवयवांना व स्नायुंना आराम पोहचवतो. भावनेत व्यग्र असणाऱयांवर या रंगाची थेरपी काम करते, असं म्हणतात.
इंडीगो- डोळे, कान, नाक आणि मानसिक विकारांवर उपायासाठी या रंगाची थेरपी गरजेची असते. धैर्य प्रदान करणारा आणि दुसरीकडे शांततेचा गुण असणारा हा रंग.
अशा विविध रंगांच्या थेरपीच्या माध्यमातून एखाद्याला विकारातून बाहेर काढण्यास मदत मिळू शकते. ही जुनी पद्धत असली तरी आजच्या जमान्यात अशा प्रकारची वेगळी उपचार प्रणाली वापरून पाहायला हरकत नसते.
कौशल्य काय लागते-
लोकांना मदत करण्याची भावना
रंगांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छा
उत्तम संवाद क्षमता
रंगांविषयी अधिक संशोधन करण्याची तयारी
ऐकण्याची उत्तम क्षमता असल्यास उपचारात फायदेशीर ठरते
पात्रता-
या क्षेत्रात यायचं असेल तर आपल्याला आधी या क्षेत्राशी संबंधीत विषयात डिप्लोमा अथवा पदवी प्राप्त करणे आवश्यक ठरेल. उच्च शिक्षण घेतल्यास अधिक फायदा होतो. क्रोमोथेरपी विषयातला डिप्लोमा किंवा पदवी घेतलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध होते. बायोलॉजी (जीवशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र)आणि फिजीक्स (भौतिक शास्त्र) या विषयांचे सामान्य ज्ञान गरजेचे असेल. स्वतःचे क्लिनीक सुरू करता येते. याखेरीज इस्पितळात, नेचर केअर, हेल्थ केअर सेंटर, नॅचरोपथी क्लिनीक्स आदीमध्ये नोकरीच्या संधी आजमावता येतात. तसेच शिक्षकाची नोकरीही करता येते.
अभ्यासक्रम-
भारतात या विषयाचा अभ्यासक्रम घेणाऱया संस्था कमी आहेत. काही महाविद्यालये नॅचरोपथी अँड योगिक सायन्सच्या साडेपाच वर्षाच्या अभ्यासक्रमात क्रोमोथेरपीचा विषय घेतात. इन्स्टिटय़ूट ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीन्स (आयएएमके) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीन्स अँड रिसर्च (आयएएमआर) या कोलकात्यातील मुख्य संस्था या विषयात डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम घेतात. नियमीत व त्याशिवाय पत्रव्यवहारानेही (करस्पॉन्डन्स) हा अभ्यासक्रम करता येतो. बारावी उत्तीर्ण असण्याची पात्रता असावी लागते. डिप्लोमा अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत आहे, ज्यासाठी मात्र दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. शैक्षणिक संस्थांव्यतिरीक्त काही आरोग्य केंद्रातही हा अभ्यासक्रम घेतला जातो.
संस्था
- महेंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीन, जयपूर
- ऍक्युप्रेशर रिसर्च, ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट इन्स्टिटय़ूट, जोधपूर
- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीन, कोलकाता
- ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर अल्टरनेटीव्ह मेडिसीन, कोलकाता