मद्यपींना गुजरातच्या या गावात अनोखी शिक्षा
गुजरातच्या अहमदाबामध्ये मोतीपुरा नावाचे गाव आहे. या गावात नट समुदायाचे लोक मोठय़ा संख्येत राहतात. समुदायातील लोकांनी मद्यपानाचे व्यसन संपविण्यासाठी एक अनोखा सामाजिक प्रयोग केला आहे. मद्यपींवर दंड ठोठावणे आणि शिक्षेदाखल रात्रभर पिंजऱयात कैद करण्याचा हा प्रयोग आहे. याचे निष्कर्ष चमत्कारिक असल्याने जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये हा प्रयोग होऊ लागला आहे.
मद्यपान ठरले होते संकट
साणंदपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर मोतीपुरा गाव मद्यपानाचे संकट झेलत होते. गावात किमान 100 महिला मद्यपानाच्या व्यसनामुळे विधवा झाल्या आहेत. हे संकट संपविण्यासाठी समुदायातील लोकांनी एक अनोखा पुढाकार घेतला असून यात महिलांचीच मदत घेण्यात आली. गावात एका पिंजऱयाची व्यवस्था करत मद्यपान करणाऱया व्यक्तीला रात्रभर तेथे कैद केले जाते. याचबरोबर त्याच्यावर 1200 रुपयांचा दंड ठोठावण्यात यायचा, ही रक्कम आता वाढविण्यात आली आहे.
अन्य गावांकडूनही अनुकरण
मोतीपुरा गावाच्या या मॉडेलच्या यशाने अन्य गावांनाही प्रेरित केले आहे. अहमदाबाद, सुरेंद्रनगर, अमरेली आणि कच्छ जिल्हय़ातील 23 हून अधिक गावांनी या सामाजिक प्रयोगाचा अवलंब केला आहे. दंडाची रक्कम वाढवून 2500 रुपये करण्या आली असून हा पैसा स्थानिक सामाजिक कार्यांकरता वापरण्यात येतो.
महिलांचे योगदान
या अनोख्या सामाजिक प्रयोगाची सुरुवात नट बजानिया समुदायाचे नेते आणि गावाचे सरपंच बाबू नायक यांनी केली. सध्या 24 गावांनी याचे अनुकरण केले आहे. यातील बहुतांश गावांमध्ये सरासरी 100 ते 150 ‘लिकर विडोज आहेत, म्हणजेच पतींना मद्यपानाचे व्यसन असल्याने या महिला विधवा झाल्या आहेत. आता या अनोख्या पुढाकाराच्या यशामागे महिलांचेच महत्त्वाचे योगदान आहे. महिलाच मद्यपीबद्दल माहिती देतात. या महिलेची ओळख गुप्त ठेवण्यात येते आणि दंडापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेपैकी 501 किंवा 1100 रुपये संबंधित महिलेला इनामादाखल देण्यात येतात.
घरगुती हिंसाचारात घट
मद्यपी पतींमुळे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले होते. पण गावात आता घरगुती हिंसाचारात 90 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गावात पिंजऱयात एक रात्र घालविल्यावर आणि समुदायाकडून सामाजिक बहिष्काराचा इशारा देण्याचे कृत्य अत्यंत उपयुक्त ठरले आहे.